धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे २५ रोजी रात्री आठ बंद घरांमध्ये चोरी झाली. दि. २६ रोजी पहाटे हा प्रकार उघड झाला. या चोरींमध्ये साधारण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समोर आले आहे.
पिंप्री खुर्द येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले अभय धनगर यांच्या घरात, कपाटातील सर्व साहित्य चोरांनी अस्ताव्यस्त फेकले, तर बचत गटाच्या हप्त्याचे ठेवलेले १६ हजार रुपये चोरांनी लांबवले तर डॉ. पंकज मराठे यांच्या दवाखान्याचा कडीकोडा तोडून चोरांनी साहित्याची फेकाफेक केली. बाहेरगावी गेलेले कल्याणसिंग पाटील यांच्या बंद घरातही चोरांनी नासधूस केली, तसेच पर्समधील २० हजार रुपये चोरट्यांनी चोरले. तसेच अयोध्या नगरातील रहिवासी व आश्रमशाळा शिक्षक रामेश्वर आंधळे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी साहित्य फेकले. त्यांचे घर चोरांनी दुसऱ्यांदा फोडले आहे. तर अनिल मनोरे यांच्या बंद घराचा कडीकोडा चोरांनी तोडला. पिंप्री खुर्द गावात ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यात चोरटे कैद झाले आहेत का?, याबाबत पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती घेत आहेत. दरम्यान, धरणगावचे पोलिस निरीक्षक उद्धव हमाले हेड कॉन्स्टेबल मोती पवार, राहुल बोरसे यांनी घटनास्थळी पाहणी केली.