धरणगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदार संघात धरणगाव शहरात विविध भागात शांततेत मतदान पार पडले. शहरातील मतदान केंद्रांवर नगरपालीकेद्वारा थीमबेस विशेष मतदान केंद्र सजवण्यात आले होते. मतदारांना मतदानासाठी आकर्षीत करणे आणि त्यांचे उन्हापासून संरक्षण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
येथील पी. आर. हायस्कूलमध्ये दिव्यांगासाठी मतदान कक्ष उभारण्यात आला होता. मराठी शाळा क्र. १ मध्ये बालकवींच्या स्मृतीला समर्पित कक्ष उभारण्यात आला होता. येथील औदुंबर वृक्षाजवळ सेल्फिपाॅईंट बनवला होता. तेथे बालकवींची प्रतिमा आणि औदुंबर कविता चितारण्यात आली होती. दुसऱ्या केंद्रावर लोककलांचे संवर्धन हा विषय घेवून कक्ष सजवला होता. यात भारतीय लोककला आणि संतपरंपरांची सचित्र दर्शन घडवण्यात आले होते. मतदानाला आलेले मतदार या उपक्रमाने भारावून गेले. त्यांनी प्रत्येक कक्षात सेल्फि घेवून सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार मुख्याधिकारी जनार्दन पवार यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक भिकन पवार, रवींद्र गांगुर्डे, निलेश वाणी, गोपाल चौधरी यांनी प्रत्यक्षात साकार केली. मतदारांनी या उपक्रमाचे कौतुक केले.