चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील पोलीस दप्तरी कुविख्यात ख्याती असलेल्या संशयिताला जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकार्यांनी दिले. त्यानुसार दत्तात्रय उर्फ दत्तु मुकूंदा चौधरी (39, महावीर व्यायम शाळेजवळ, चाळीसगाव) याला हद्दपार करण्यात आले असून त्याची धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीत रवानगी करण्यात आली आहे.
संशयित दत्तात्रय उर्फ दत्तु मुकुंदा चौधरी (39) विरोधात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत तसेच साथीदारांना घेवून दंगल आदी आठ गुन्हे दाखल होते. जामिनावर सुटताच संशयित गुन्हे करीत असल्याने त्याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. छाननीअंती प्रांताधिकार्यांनी संशयिताला शुक्रवार, 16 जूनच्या पुढील सहा महिन्यांपर्यंत जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निरीक्षक संदीप पाटील, सहा.निरीक्षक सचिन कापडणीस, योगेश बेलदार, विनोद भोई, तुकाराम चव्हाण, रवींद्र पाटील, दीपक प्रभाकर पाटील, चत्तरसिंग महेर, प्रवीण साहेबराव जाधव आदींच्या पथकाने संशयिताला आदेशानंतर ताब्यात घेत धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीत रवाना केले.
सराईत गुन्हेगार निखील उर्फ भोला सुनील अजबे (21, नारायणवाडी, चाळीसगाव) व वाजीदखान साबीरखान (23, नागदरोड, झोपडपट्टी, चाळीसगाव) यांच्याविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करून त्यांची अमरावती व येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. यापुढे चाळीसगावातील शांतता बिघडवणार्या गुन्हेगारांवर मोक्का, एम.पी.डी.ए., हद्दपारीची कारवाई केली जाईल, असा इशारा निरीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.