जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कोल्हे हिल्स परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात आलेल्या तरूणाला परिसरातील नागरीकांनी पकडून बेदम मारहाण करून पोलीसांच्या ताब्यात दिल्याची घटना शुक्रवारी १४ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. एवढेच नाही तर संतप्त जमावाने तरूणाची दुचाकी पेटवून त्याला त्याच्यावर फेकण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
कोल्हे हिल्स परिसरात पर्त्याच्या घरात एक कुटुंबिय गेल्या १३ वर्षांपासून वास्तव्याला आहे. या ठिकाणी पती-पत्नी दोन मुले आणि दोन मुली वास्तव्याला आहे. शुक्रवार १४ जुलै रोजी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे आईवडील व दोन्ही भाऊ कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यावेळी सोळा वर्षीय मुलगी व तिची सहा वर्षाची लहान बहिण घरीच होत्या. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चंदुअण्णा नगरात राहणारा तरूण हा दुचाकी (एमएच १९ डीक्यू ७१७८) ने मुलीच्या घराजवळ आला.
पाणी पिण्याचा बहाणा करून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पिडीत मुलीची सहा वर्षाची लहान बहिणीने आरडओरड केल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेत संशयित तरुणाला रंगेहात पकडले. संतप्त नागरीकांनी तरूणाचा चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांची दुचाकी पेटवून दिली. हा प्रकार घडल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेत तरूणाला ताब्यात घेतले.
बहिणीशी वाईट वागताना अनोळखी व्यक्तीला पाहून लहान बहिणीने घराबाहेर जावून आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून ५० ते ६० जणांचा जमाव गोळा झाला. तरुणांनी लहान मुलीच्या सांगण्यावरून पीडित मुलीच्या घरात जावून पाहिले तर मद्यपी तरुण पिडीतेशी अंगलट करताना आढळला. त्याला बाहेर ओढून आणत जमावाने बेदम मारहाण केली. तो शुद्धीत नव्हता. जमावालाही शिवीगाळ करत होता. त्यामुळे जमाव अधिक संतापला. या वेळी त्याची दुचाकी (एमएच डीओ ७१७८) पेटवून दिली. त्यासोबतच त्यालाही गाडीवर टाकण्याचा प्रयत्न जमावाने केला. यावेळी काही जणांनी त्यांना आवरून पोलिसांना बोलावले. तालुका पोलिस घटनास्थळी आले त्यांनी तरुणाला ताब्यात घेतले.