औरंगाबाद (वृत्तसंस्था) राज्यात एकीकडे भोंग्यांवरुन वातावरण तापलेलं असतानाच, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी औरंगाबाद शहराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, काही लोक औरंगजेबच्या कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा पसरली होती. त्यामुळे लगेच कबरीचे मुख्य दार बंद करण्यात आले.
औरंगाबाद जवळील खुलताबाद येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही लोक औरंगजेबच्या कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा पसरली होती. त्यामुळे लगेच कबरीचे मुख्य दार बंद करण्यात आले. अफवा नागरिकांच्या कानावर पडताच स्थानिक नागरिकही जमायला सुरुवात झाली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ औरंगजेबच्या कबरीकडे धाव घेतली. पोलिसांनी काही झाले नाही, काही होणार नाही, असे समजावत नागरिकांना तिथून बाहेर जाण्यास भाग पाडले आहे. आता कबरीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.