झारखंड (वृत्तसंस्था) प्रेयसीसोबत असताना दोन वेळा तिच्या मोबाईलवर दुसऱ्या बॉयफ्रेंडचा फोन आल्यामुळे संतापलेल्या तरुणाने तरुणीला थेट धरणात लोटून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून तरुणाने आपला गुन्हा कबूल केला आहे.
झारखंडच्या गुमला भागात राहणाऱ्या १९ वर्षीय रंजिताचं अनुरंजन नावाच्या तरुणासोबत अफेअर होतं. आपली मुलगी रोज कुणासोबत तरी फोनवर बोलायची आणि तिच्या खोलीत जाऊन झोपायची, अशी माहिती रंजिताच्या आईनं पोलिसांना दिली. मात्र एक दिवस सकाळी ती घरी परतलीच नसल्याचं सर्वांच्या लक्षात आलं आणि पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. दोन दिवसांनी पोलिसांना परिसरातील धरणात एक मृतदेह सापडला. ओळख पटवल्यानंतर तो रंजिताचाच असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी शोध घेतला असता रंजिताचा खून तिच्या बॉयफ्रेंडनं केल्याचं निष्पन्न झालं.
घटनेच्या दिवशी एका धरणाच्या परिसरात रंजिता आणि अनुरंजन एकमेकांना भेटले होते. मात्र त्याचवेळी रंजनाला एका तरुणाचा फोन आला. त्याच्याशी काही वेळ बोलल्यानंतर तिने फोन ठेवला, मात्र त्यावरून दोघांमध्ये वादाला सुरवात झाली. हा वाद सुरू असताना काही वेळानंतर पुन्हा एकदा त्या तरुणाचा रंजनाला फोन आला. यावेळी रंजनाच्या हातातून अनुरंजनने फोन हिसकावून घेतला आणि स्वतः बोलायला सुरुवात केली. आपण रंजिताचे बॉयफ्रेंड असल्याचं फोनवरील व्यक्तीनं सांगितलं. त्यानंतर रागाचा पारा चढलेल्या अनुरंजननं शेजारी असणाऱ्या धरणाच्या पाण्यात रंजिताला ढकलून दिलं. पोलिसांनी अनुरंजनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.