जळगाव (प्रतिनिधी) घराकडे का बघतोस असे म्हणत एका २२ वर्षीय तरुणाला लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याची घटना शहरातील गाडगेबाबा चौक ते पठाण बाबाकडे जाणाऱ्या रोडवरील ग्राउंडवर घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सैय्यद अकबर सैय्यद सलाउद्दीन (वय २२ रा. वंजारी टेकडी समता नगर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १८ जून २०२२ रोजी सैय्यद याला सोनू आढळे याने मोबाईलवर फोन करून सैय्यद याला गाडगेबाबा चौकात बोलावून घेतले. त्यानंतर त्याला मोटारसायकलवर बसवून पठाण बाबाकडे जाणाऱ्या रोड वरील ग्राउंडवर घेऊन गेला. तेथे गेल्यावर तू हमेशा मेरे घर की तरफ क्यू देखता है?, असे बोलून सैय्यदने त्याच्या गालावर चापट मारली व तूला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. यावेळी सोनू सोबत असलेले सुशांत कोळी, पप्पू आढळे, आकाश भालेराव (सर्व रा. समता नगर वंजारी टेकडी, जळगाव) यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या हातातील लाकडी काठ्यांनी सैय्यद याच्या दोन्ही हात, पाय, खांदे चेहर्यावर मारहाण केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.