धरणगाव (प्रतिनिधी) देशात संचारबंदीच्या काळात एकही गरजू आणि गरीब व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शिधावाटप दुकानांवर राज्य सरकार मुबलक प्रमाणात अन्नधान्यांचा पुरवठा करत असले तरी धरणगावमधील सर्व शिधावाटप दुकानांमध्ये लाभार्थींना महिना संपत आला तरी धान्य उपलब्ध होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
९९ हजार ५१७ गरीब लाभार्थी उपाशी
धरणगाव शहर व तालुक्यात १०६ धान्य दुकानांव्दारे धान्य वितरण केले जाते. धरणगाव तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेतील धान्य वितरणाचा लाभ ७ हजार ३४३ रेशनकार्ड धारकांना होतो. तर लाभार्थींची संख्या ९९ हजार ५१७ आहे. तर प्रत्येक महिन्याच्या २० तारखेपर्यंत दुकानदारांना धान्य गोडाऊनमधून धान्याचा पुरवठा होऊन जातो. तर पुढील महिन्यापर्यंत जास्तीत जास्त ५ तारखेपर्यंत लाभार्थींना संपूर्ण धान्य वाटप होऊन जाते. परंतू जानेवारी महिना संपत आला तरी रेशन मिळत नसल्यामुळे गरीब लाभार्थी सैरभर झाले आहेत.
शहर व ग्रामीण भाग वेगळे करून वाहतूक ठेका वेगळा
धरणगाव शहर व ग्रामीण भाग याचा रेशन वाहतूक ठेका वाहतूक वेगळा करण्यात आला आहे. त्यानुसार धरणगाव शहरला जळगावहून धान्य पोहोच करण्यात येईल. तर ग्रामीण भागाला धरणगाव शासकीय धान्य गोडावूनमधून रेशन वितरीत होणार आहेत. परंतु या बाबतीत योग्य नियोजन नसल्याने माहे जानेवारी महिन्याचे धान्य अजून पावेतो दुकानात पोहोच झाले नाही. या प्रकारामुळे सर्व गरीब लाभार्थ्यांची गैरसोय झाली असून या जानेवारी महिन्यात धान्य मिळेल किंवा नाही? अशी शंका उपस्थित करीत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात सुद्धा अजून पावेतो धान्य पोहचलेले नाहीय. तसेच रेशन दुकानदारांच्या मशीनमध्ये डेटा उपलब्ध नसल्याने ग्राहकांना धान्य वाटप करता येणार नाहीय. या ढिसाळ नियोजनामुळे गरिबांचे हाल होत असून दुकानदार वर्गाला रोषाला सामोरे जावे लागत आहे
देशातील आणि राज्यातील रेशनिंगच्या धान्यावर अवलंबून असलेले एकही कुटुंब उपाशी राहणार नाही, यासाठी केंद्र सरकारने गोरगरीब आणि गरजू लाभार्थींपर्यंत वेळेत धान्य पोहोचण्यासाठी आपत्कालीन स्थितीतही वितरणाची व्यवस्था केली होती. परंतू आता परिस्थिती गंभीर नसतांनाही फक्त ढिसाळ नियोजनामुळे गरिबांना हे सरकार उपाशी ठेवतेय. गरजू लाभार्थींपर्यंत वेळेत न मिळाल्यास भाजप आंदोलन करेल.
अॅड. संजय महाजन (भाजप ओबीसी आघाडी, जिल्हाध्यक्ष)