जळगाव (प्रतिनिधी) भंगार विक्रेत्याला मारहाण करीत त्याच्याजवळील रोकड हिसकवणाऱ्या भोलासिंग जगदिशसिंग बावरी (वय ३२, रा. तांबापुर) याच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापुर्वीच त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देवून तो न्यायालयातून पसार झाल्याची घटना बुधवारी घडली.
मारहाण करून रोकड हिसकावली होती !
शहरातील दशरथ नगरात भंगार विकणाऱ्या समीर रमराज तडवी (रा. तांबापुर) हा दि. ११ रोजी दशरथ नगर परिसरात भंगार गोळा करण्यासाठी गेला होता. दरम्यान, त्याठिकाणी भोलासिंग याने त्याला तेरे पास कितने पैसे है असे विचारले. परंतु तडवी याने त्याला पैसे देण्यास नकार दिला असता, भोलासिंग बावरी याने तडवी याला मारहाण करीत त्याजवळील तीन हजार रुपयांची रोकड जबदस्तीने हिसकावून घेतली आणि तो तेथून पसार झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होताच अवघ्या तासाभरात शनीपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने भोलासिंग जगदिशसिंग बावरी याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
कोठडीत जाण्यापुर्वीच भोला फरार !
न्यायालयाच्या आवारातून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापुर्वीच संशयित आरोपी पळून गेल्याने खळबळ माजून गेली होती. दरम्यान, शनिपेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांसह एमआयडीसी पोलीसांकडून संशयित भोलासिंग बावरी याच्या शोध घेतला जात आहे.
घरफोडी, खंडणीसारखे गंभीर गुन्ह्यातील संशयित !
पसार झालेल्या भोलासिंग बावरी याच्यावर या पूर्वी एमआयडीसी, रामानंद नगर, जिल्हा पेठ पोलिस ठाणे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडी, दरोडा, हाणामारी, विनयभंग यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
चार दिवसांपुर्वी कारागृहातून सुटका !
पोलिसांना गुंगारा देवून पळून गेलेला भोलासिंग बावरी हा तीन-चार दिवसांपुर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. बाहेर येताच त्याने चोरीचे सत्र पुन्हा सुरु केले. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देवून तो पसार झाला. या घटनेला पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांनी दुजोरा दिला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
आदेशाची प्रत घेण्यासाठी थांबले होते कर्मचारी !
तासाभरात अटक केल्यानंतर भोलासिंग बावरी याला बुधवार दि. १२ जून रोजी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली. परंतु शनिपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी हे न्यालयाच्या आदेशाची प्रत घेण्यासाठी थांबले होते. हीच संधी साधत संशयित भोलासिंग याने पोलिसांच्या हातावर तुरी देवून तो तेथून पळून गेला.