जामनेर (प्रतिनिधी) माझ्याविरुद्ध साक्ष देऊ नको, नाही तर तुला केसमध्ये फसवतो, अशा शब्दात भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद रायसोनी (रा. बळीराम पेठ, जळगाव) यांनी साक्षीदारास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bhr Scam Jalgaon)
चतरसिंग सपकाळ (रा.तळेगाव ता. जामनेर) यांनी शुक्रवारी जामनेर पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहाराचा खटला न्यायालयात सुरू आहे. सपकाळ यातील एक साक्षीदार आहेत. ते पतसंस्थेच्या मालकीच्या तळेगाव येथील गोशाळेची देखभाल करतात. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, रायसोनी यांनी ‘तू गोशाळा सोड, माझा जामीन झाला आहे. माझ्या विरोधातील प्रकरणात साक्षीदार आहेस, माझ्याविरुद्ध साक्ष देऊ नको, नाही तर तुला केसमध्ये फसवतो,’ असे सांगून पत्नी सरला व मुलगा धनंजय यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.