जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर (Bhr) पतसंस्थेतील घोटाळ्यातील संशयितांना जामिनासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात 1 कोटी 22 लाख रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी तत्कालिन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण, ऑडीटर शेखर सोनाळकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. (Jalgapn Crime News)
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झवर यांना जामीन मिळवून देण्यासाठी तत्कालिन विषेश सरकारी वकील प्रवीण चव्हाण, अॉडीटर शेखर सोनाळकर, उदय नानाभाऊ पवार या तीघांनी सुनील झवर यांचा मुलगा सूरज यांच्याकडून १ कोटी २२ लाख रुपये खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून अॅड. चव्हाण व सोनाळकर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. गुरूवारी त्यांना अटीशर्तींवर जामीन मंजुर करण्यात आला. तर या गुन्ह्यातील तीसरे संशयित आरोपी उदय पवार यांनी देखील अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर २१ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्यासमोर दि. १४ रोजी सरकारी फिर्यादी व आरोपी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. जळगाव न्यायालयाने जामीन मंजूर केल्यावर फिर्यादी पक्षाच्यावतीने उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. दरम्यान, खंडणी गुन्ह्याचे फिर्यादी सूरज झवर यांनी गेल्या महिन्यात पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर ऑडीटर शेखर सोनाळकर, अॅड. प्रवीण चव्हाण यांनी खंडणी घेतल्याचे काही पुरावे फिर्यादी झवर यांनी पोलिसांना दिल्याचा दावा आहे.