जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ५ संशयितांच्या जामीन अर्जावर आज पुणे न्यायालयात कामकाज झाले. आरोपी पक्षाने आज आपला युक्तिवाद न्यायालयात सादर केला. तर उद्या (मंगळवारी) सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण युक्तिवाद सादर करणार आहेत. दरम्यान, याआधी २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या वकिलांनी आपली बाजू मांडलेली आहे.
बीएचआर मधील साधारण १२०० कोटीच्या घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२० आणि २०२१ अशा दोन वेळी राज्यात छापेमारी करून बीएचआर घोटाळ्यातील संशयितांना अटक केली आहे. यातील १७ जून रोजी अटक केलेल्या ११ पैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), राजेश लोढा (जामनेर) या संशयितांनी जामिन अर्ज दाखल केले होते. तर यापैकी जयश्री तोतला आणि जयश्री मणियार या दोघांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने २५ जून आधीच फेटाळून लावलेला आहे.
त्यानंतर २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या जामीन अर्जावर सुनवाई झाली. यावेळी जयश्री तोतला यांच्या वकिलाने घोटाळयाबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. आम्ही नियमाप्रमाणे कर्ज भरलेले आहे. ३० टक्क्यात पावत्या मॅचिंग कशा झाल्या?, याबाबत कंडारेलाच माहिती असलल्याचा युक्तिवाद केला होता. तसेच संशयीतांचा घोटाळ्याशी काहीही संबंध नाहीय. पोलिसांनी केलेली अटक चुकीची आहे. फिर्यादीत आरोपी म्हणून उल्लेख नसतांना बेकायदेशीर अटक केली गेली. तर दुसरीकडे कर्ज घेणे हा गुन्हा नाहीय. आमच्याकडे थकबाकी असल्यास न्यायालयाच्या सुचनेप्रमाणे भरण्यास तयार असल्याचे इतर संशयितांच्या वकिलाने न्यायालयास सांगितले होते.
तर आज छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, प्रितेश चंपालाल जैन, प्रेम नारायण कोकटा, राजेश लोढा या उर्वरित संशयितांच्या वतीने अॅड. सुधीर शहा आणि एस.पी. जैन यांनी देखील जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, आता उद्या सरकार पक्ष आपला युक्तिवाद सादर करणार आहे. तसेच अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद) यांच्यावतीने अॅड. हर्षद निंबाळकर हे देखील उद्याच युक्तिवाद सादर करणार आहेत. न्यायमूर्ती एस एस गोसावी यांच्या न्यायालयात या सर्व जामीन अर्जावर कामकाज सुरु आहे.
विजय वाघमारे (9284058683)