जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींपैकी ९ जणांनी पुणे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता असलेला मुख्य संशयित सुनील झंवरने देखील पुन्हा एकदा अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, या सर्वांच्या जामीन अर्जावर उद्या (शुक्रवार) कामकाज होणार आहे.
बीएचआर मधील साधारण १२०० कोटीच्या घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२० आणि २०२१ अशा दोन वेळी राज्यात छापेमारी करून बीएचअआर घोटाळ्यातील संशयितांना अटक केली आहे. यातील १७ जून रोजी अटक केलेल्या ११ पैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद),जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), प्रितेश चंपालाल जैन (धुळे) या ९ संशयितांनी जामिन अर्ज दाखल केले आहेत. या सर्वांची २२ जून रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. दुसरीकडे मुख्य सूत्रधार सुनील झंवरचा अनेकदा अटकपूर्व जामीन फेटाळलेला असतानाही त्याने पुन्हा एकदा पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतली आहे. या सर्वांच्या अर्जावर उद्या (शुक्रवार) सुनावणी होणार आहे.