जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थे मधील गैरव्यवहाराशी संबंधीत संशयित आरोपी उद्योजक सुनील झंवर यांच्या खान्देश कॉम्प्लेक्समधील कार्यालयातून महापालिकेशी संबंधित वॉटर ग्रेस कंपनीच्या कागद पत्रांसह माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, कागदपत्र जप्त केली आहेत. परंतू कुणाच्याही नावाचा कागद हा नेमका कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, याचा सखोल तपास केल्यानंतर अधिकचे बोलता येईल, अशी प्रतिक्रिया आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘द क्लिअर न्यूज’ला देत कुणाचेही नाव घेण्याचे टाळले.
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थे मधील गैरव्यवहाराशी संबंधीत उद्योजक सुनील झंवर यांच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समधील सुनील झंवर यांचे रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात झाडाझडती घ्यायला सुरुवात केली होती. याठिकाणी पोलिसांना महापालिकेशी संबंधित वॉटर ग्रेस कंपनीच्या कागद पत्रांसह एटीएम कार्ड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवटके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शहरात काही ठिकाणी तपासणी सुरु होती. रमेश रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात अनेक कागदपत्र जप्त करण्याची कारवाई सुरु आहे. कुणाच्या नावाचा एखादं कागद सापडला म्हणून लगेच निष्कर्ष काढता येत नाही. ते कागदं नेमके कशाशी संबंधित आहेत. याची चौकशी करावी लागेल, त्यावर आताच बोलणे योग्य ठरणार नाही, असे सांगत कुणाचेही नाव घेण्याचे टाळले. तर नवटके या पुढील तपासाठी पुण्याला रवाना झाल्याचे कळते. दरम्यान, अटकेतील चारही आरोपींची पुण्यात चौकशी सुरु असून त्यांना जळगाव आणले जाण्याची शक्यता कमी आहे.