जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरने मंगेश चव्हाण यांच्यासोबत आपले आर्थिक संबंध असल्याचे मान्य केल्याची माहिती आज न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रिमांडनोटमधून समोर आली आहे. दुसरीकडे झंवरने चौकशीत काही गोष्टी मान्य केल्या आहेत. तर अनेक गोष्टी नाकारल्या आहेत.
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत २३ ऑगस्टपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशकात १० ऑगस्ट रोजी सापळा रचून अटक केली होती. कोठडीत असूनदेखील झंवरने पोलिसांना तपासात योग्य माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे कळतेय. परंतू याच बरोबर त्याने मंगेश चव्हाण यांच्यासोबत आपले आर्थिक संबंध असल्याचे मान्य केल्याची माहिती आज समोर आली आहे. विशेष सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांनी देखील आज सुनील झंवरला पोलीस कोठडी वाढवून मिळावी म्हणून केलेल्या युक्तिवादात झंवरने मंगेश चव्हाण यांच्यासोबत आर्थिक संबंध असल्याचे मान्य केले असल्याचे न्यायालयास सांगितले.
दुसरीकडे बीएचआर घोटाळ्याशी माझा किंवा माझ्या परिवारातील कोणत्याही सदस्याचा संबंध नाही. पावत्या मॅचिंग, मालमत्ता खरेदी किंवा सुनील झंवर यांच्याशीही देखील माझा किंवा माझ्या कंपनीचा संबंध नाहीय, असे चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी जळगावला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. एवढेच नव्हे तर, राजकीय षडयंत्रातून आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील आ.चव्हाण यांनी लावला होता.