जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत शुक्रवारी (१३ मे) जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून सकाळी १०.३० वाजता रावेर तालुक्यातील चिंचाटी येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील हे राहणार आहेत. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची विशेष उपस्थिती तर खा. रक्षाताई खडसे, खा.उन्मेश पाटील, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.चंदुलाल पटेल, आ.किशोर दराडे, आ.शिरीशदादा चौधरी, आ.चिमणराव पाटील, आ.गिरीश महाजन, आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ.अनिल पाटील, आ.किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ.लताताई सोनवणे, आ.मंगेश चव्हाण आणि महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी ११ वाजता मोर धरणावरील नियोजित सौर ऊर्जा स्थळाची पाहणी करून दुपारी २ वाजता भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रात महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांच्या कामकाजाचा ऊर्जामंत्री डॉ.राऊत आढावा घेणार आहेत.
नियोजित उपकेंद्रामुळे चिंचाटी भागातील ग्राहकांना आणखी योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळणार असून रावेर तालुक्यामध्ये भविष्यात येणारी विजेची मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे. तरी भूमिपूजन कार्यक्रमाला या भागातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारुख शेख, सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे यांनी केले आहे.