जळगाव प्रतिनिधी | मित्रांसोबत हॉटेलमधून जेवण करून घरी कासमवाडी येथे परतत असताना कारचा ताबा सुटल्याने थेट झाडावर आढळल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. या अपघातात इतर ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आनंदा शांताराम सोनवणे वय-३९ रा. कासमवाडी, जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भैरव भगवान राणे प्रवीण उर्फ पप्पू आढाव आणि योगेश भालचंद्र रेम्बोटकर सर्व रा. कासमवाडी हे जखमी झाले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात आनंदा सोनवणे हा दोन भाऊ, आई-वडील, पत्नी, दोन मुलांसह वास्तव्याला होता. सोशल वर्क अर्थात सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो काम पाहत होता. दरम्यान रविवारी १४ जुलै रोजी दुपारी तो त्याचा मित्र भैरव भगवान राणे आणि पप्पू आढाव यांच्यासोबत कारने शिरसोली गावाजवळील हॉटेल एमएच 19 येथे जेवण करण्यासाठी गेला होता. दरम्यान जेवण आटोपून कासमवाडी येथे येण्यासाठी निघाले असता दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुलाबराव देवकर कॉलेजच्या पुढे एका झाडावर त्यांची कार आदळली. या भीषण अपघातात आनंदा सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले भैरव राणे, पप्पू आढाव आणि योगेश रेंभोटकर हे गंभीरित्या जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मित्रपरिवार व नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. या संदर्भात अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.