भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडटीआरआय) लावलेल्या भाडे तत्वावरील वाहनाच्या लॉग बुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची स्वीकारताना झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षकाला पुणे सीबीआयने रंगेहाथ अटक केल्याने रेल्वेतील लाचखोर अधिकार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. बुधवार, 6 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कार्यालय अधीक्षक (टेंडर)योगेश देशमुख व प्राचार्य सुरेश चंद्र जैन अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
लाच प्रकरणी कारवाई
भुसावळातील एका तक्रारदार तरुणाने रेल्वे प्रशिक्षण संस्थेत भाडे तत्वावर वाहने लावली आहेत. मार्च एण्ड पूर्वी लावलेल्या वाहनांचे बिल निघण्यासाठी तरुणाने कार्यालय अधीक्षक (टेंडर) योगेश देशमुख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर जुने तारखेवरील लॉग बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी प्राचार्य यांची स्वाक्षरी आणण्यासाठी लाच मागण्यात आली व नऊ हजारांची लाच स्वीकारण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने पुणे सीबीआयकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणी करण्यात आली. बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सीबीआयने योगेश देशमुख यास लाच रक्कम दिल्यानंतर देशमुख याने प्राचार्यांच्या दालनात प्रवेश करीत लाच रक्कम प्राचार्यांना दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या सीबीआय पथकाने सुरूवातीला देशमुख व नंतर सुरेश चंद्र जैन यांना अटक केली. या कारवाईनंतर रेल्वे वर्तुळातील लाचखोर अधिकार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
प्राचार्यांच्या घरासह कार्यालयाची झाडाझडती
पुण्यातील सीबीआय निरीक्षक महेश चव्हाण व 17 अधिकार्यांच्या उपस्थितीत लाच प्रकरणात प्राचार्यांसह कार्यालय अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली. अधिकार्यांच्या पथकाने प्राचार्यांची दालनाची कारवाईनंतर झाडाझडती घेतली तसेच रेल्वे फिल्टर हाऊसजवळील डॅनियल चौकासमोरील ‘सी 254’ या प्राचार्यांच्या बंगल्याचीही झडती घेण्यात आली तसेच कार्यालय अधीक्षक देशमुख याच्या घराचीही झडती घेण्यात आली मात्र त्यात काही आढळले वा नाही ? याबाबत माहिती कळू शकली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून प्राचार्यांसह कार्यालय अधीक्षकांच्या लाचखोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या मात्र तक्रार देण्यास कुणीही पुढे येत नव्हते मात्र तरुणाने धाडस करीत तक्रार नोंदवली लाचखोर गजाआड झाल्यानंतर प्रशिक्षण संस्थेतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
2021 मध्ये डीआरएम कार्यालयात झाली होती कारवाई
सोमवार, 16 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता भुसावळ डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व ओ.एस.संजय रडे यांना दोन लाख 40 हजारांची लाच घेताना नागपूर सीबीआयच्या पथकाने दालनातच रंगेहाथ अटक केली होती. मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी गुप्ता यांनी दोन लाख तर रडे यांनी 40 हजारांची लाच मागितल्याने मलकापूर येथील तक्रारदाराने हा सापळा घडवून आणला होता. विशेष म्हणजे घर झडतीत मंडळ अभियंता गुप्ता याच्या घरात 15 लाखांचे घबाडही पथकाला गवसले होते.