बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार अवैध गौण खनिज वाहतूक करण्याऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. या मोहिमेत बोदवड येथे कारवाई करत असताना दि. १२ रोजी कोतवालास मारहाण करून ट्रॅक्टर ट्रॉली पळवून नेली होती. या प्रकरणी बोदवड पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.
दि. १२ रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या दरम्यान महात्मा फुले चौक येथे शेलवडचे कोतवाल गजानन सुरेश अहिरे यांना अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या आरोपींनी अडवून धमकी देऊन मारहाण करत दुखापत केली होती. एवढेच नव्हे तर तहसील कार्यालयातून जप्त ट्रॅक्टर ट्रॉली पळवून नेण्याची घटना घडली होती. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याचा व मारहाण केल्याचा दीपक तुळशीराम सपकाळ, जंगलू मांगो मोरे व एका अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३५३,३३२,३९४,३४१, व ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या विषयी तात्काळ आरोपी निष्पन्न करत तपास करण्यात यावा, असे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी बोदवड पोलिसांना केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी सपोनि अंकुश जाधव, पोहेकॉ प्रमोद तायडे, पोकॉ दिपक पाटील यांचे पथक तयार केले होते. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यांची नावे निश्चित करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागे लपलेले असतांना आरोपी जंगलू मांगो मोरे, अनिल एकनाथ शेळके, सुधाकर ओंकार राठोड या तिघांना आज १४ रोजी साडेनऊच्या सुमारास अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर या प्रकरणातील दिपक तुळशीराम सपकाळ हा फरार आहे, असे पोलिसांकडून कळाले. कोतवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी एक दिवस लेखनी बंद आंदोलन पुकारले होते.