नागपूर (वृत्तसंस्था) आईसोबत गौरी विसर्जनासाठी गेलेल्या दोघां भावंडांपैकी एकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी मंगळवारी (१९ सप्टेंबर) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. मृतक मुलाचे नाव सागर दिनेश लाडसे (१९, धापेवाडा, ता. कळमेश्वर), असे आहे.
सागर व त्याचा भाऊ साजन लाडसे (१७. धापेवाडा, ता. कळमेश्वर ) हे धापेवाडा येथील कोलबास्वामी मंदिराजवळील चंद्रभागा नदीत गौरी विसर्जनासाठी आईसोबत गेले होते. पाण्यात गौरी विसर्जन करताना मृतक साजनचा तोल गेला. त्याला वाचविण्यासाठी सागरने पाण्यात उडी घेतली. दोघांनाही पोहता येत नव्हते. दोघेही नदीपात्रात बुडायला लागले.
पोटची मुले बुडताना बघत आईने आरडाओरड केली. ही बाब स्थानिक गावकऱ्यांच्या लक्षात येताच दोघांना वाचविण्याकरिता पाण्यात उडी घेतली. लहान मुलगा साजनला वाचविण्यात यश आले; परंतु मोठा मुलगा सागरला बाहेर काढण्यासाठी विलंब झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतदेह तत्काळ हितेश बन्सोड यांच्या रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, डोळ्यासमोर पोटचा गोळा बुडाल्यामुळे आईने काळीज चिरणार आक्रोश केला होता. यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.