नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळवण्यासाठीचा निकष काय?
आता राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक किंवा राज्य स्तरावरील पक्ष असा दर्जा दिला जाईल. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी सहा टक्के मते असतील किंवा लोकसभेच्या निवडणुकीत तीन किंवा जास्त राज्यामध्ये किमान दोन टक्के मते असतील तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो.
राष्ट्रीय पक्षांचे फायदे काय?
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच निवडणूक चिन्ह मिळते. त्याशिवाय नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यालयाला जागा मिळते. निवडणुकीमध्ये दुर्दशन अथवा इतर सार्वजनिक वाहिन्यावर ब्रॉडकॉस्टिंगसाठी वेळ मिळतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर या सर्वासाठी पक्ष अपात्र ठरतात.
















