चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील हिरापूर रोडवर चाळीसगाव शहर पोलिसांनी आज मोठी कारवाई करत लाखोंच्या प्रतिबंधित गुटख्याची तस्करी उघडकीस आणली आहे. गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून बोलेरो गाडी अडवली असून, तपासणीत गाडीमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये मोठी उडाली खळबळ आहे.
पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पीएसआय संदीप घुले, पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे आणि समाधान पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. वाहनचालक सलीम मुनीर खान (रा. पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.
गाडीतील गुटख्याचे अंतिम मूल्यांकन एफडीए पथकाच्या उपस्थितीत करण्यात येणार असून, प्राथमिक अंदाजानुसार जप्त गुटख्याची किंमत सुमारे दहा लाख रुपये असल्याचे समजते. पोलिसांच्या या कारवाईने गुटखा माफियांना मोठा धक्का बसला आहे.