धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पालिकेत मागील काही वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याची गंभीर तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली आहे.
गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने 30 मार्च 2022 रोजी धरणगाव पोलिसात तब्बल 500 पानांची तक्रार देऊ केली होती. परंतू पोलिसांनी संबंधित तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्याचे कळते. यानंतर तक्रारदाराने 31 मार्च रोजी संबंधित तक्रार कायदेशीररित्या पोस्टाने पाठवली. ही तक्रार 1 एप्रिल रोजी धरणगाव पोलिसांना मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या तक्रारीनुसार मागील दोन ते तीन वर्षात पालिकेच्या विविध कामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असल्याचे कळते. या तक्रारीत तब्बल विविध 18 ठेकेदारांविरुद्ध आक्षेप नोंदविण्यात आला आहे. या तक्रारीत संबंधित ठेकेदारांविरुद्ध तब्बल विविध प्रकाराचे 60 प्रकारचे आक्षेप नोंदविण्यात आले असल्याचे कळते. दरम्यान, या तक्रारीनुसार तत्कालीन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप करण्यात आला आहे.
















