मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घर आणि मालमत्तेवर छापेमारी केल्यानंतर आता प्राप्तीकर विभागाने (income tax department) मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शिर्डी देवस्थानचे ट्रस्टी राहुल कनाल यांच्या घरी छापेमारी केली आहे. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे. आज आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आलं आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली. यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की, नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्रं किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, ही छापेमारी कोणत्या प्रकरणाशी निगडीत आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, पुण्यातील उद्योजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात ४० ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, जालना, यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हे छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाने मुंबई, पुणे, नागपूरसह जवळपास ५० ठिकाणी हे छापे टाकले. २५ निवासस्थाने आणि १५ कार्यालयांची तपासणी केली. मुंबईतील एका हॉटेल्सच्या काही सुट्सवरही छापे टाकण्यात आले. महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक, बेंगळुरू येथेही आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले. यामध्ये सुमारे ५० घरांवर छापे टाकण्यात आले.
राहुल कनाल आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय, संजय राऊतांची दुपारी पत्रकार परिषद
राहुल कनाल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागानं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. जवळपास चार दिवस हे धाडसत्र सुरु होतं. अशातच आता शिवसेनेच्या आणखी एका नेता आयकर विभागाच्या रडारवर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
आपल्याशी संबंधित लोकांना त्रास दिला जात आहे – अजित पवार
आयकरच्या छाप्यांवर अजित पवार म्हणाले, आपल्याशी संबंधित लोकांना त्रास दिला जात आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संचालकावर छापा टाकण्यात आला. हे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. केवळ माझ्याशी संबंध असल्याने त्यांचा छळ केला जात आहे. शरद पवारांनाही असाच त्रास दिला गेला. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर झालेल्या आयटी छापेवरून महाराष्ट्र सरकारचे मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, केंद्र सरकार लखीमपूर खेरीसारख्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवू इच्छित आहे.
हे तर दिल्लीतील आक्रमण – आदित्य ठाकरे
महाराष्ट्रावर हे तर दिल्लीतील आक्रमण आहे. महाविकास आघाडीची केंद्र सरकारला भीती वाटायला लागली असून युपी, पंजाब, बंगालमध्येही केंद्र सरकारने हेच केले. पण महाराष्ट्र थांबणार नाही अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरे यांनी दिली.
कोण आहेत राहुल कनाल?
राहुल कनाल शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आहेत
मातोश्रीच्या जवळचे म्हणून राहुल कनाल यांची ओळख
युवा सेना कोअर कमिटीत राहुल कनाल आहेत
टीम आदित्यचा एक चेहरा राहुल कनाल आहे
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत राहुल कनाल यांच्या नावाची होती चर्चा
महापालिकेत शिक्षण समिती सदस्य देखील राहिले आहेत