धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पाणी समस्येसह इतर समस्या सोडविण्यासाठी लवकरच जळगाव जागृत मंचची विस्तारित शाखा अर्थात धरणगाव जागृत मंचची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील आणि जितेंद्र महाजन यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हा जागृत जिल्हा जनमंच हे संपूर्ण जिल्ह्यात शेतकरी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, भ्रष्टाचार अश्या विविध मुद्ध्यांवर संपूर्ण जिल्हाभरात कार्यरत आहे. जनमंच चे प्रमुख शिवराम पाटील हे याचे नेतृत्व करतात. जिल्हाभरात सामाजिक कार्यकर्त्यांची फळी त्यांनी निर्माण केली आहे. विवध विषयांवर त्यांचे लिखाण हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत असते. नुकतेच या जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे विस्तारीकरण करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्र भर कार्यक्षेत्र वाढविण्यात आले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात व धरणगाव तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात जनजागृत जनमंचचे सुरुवातीपासून कार्य आहे. धरणगाव शहरात विविध विकासकामे जोमाने सुरु आहेत. परंतु नागरिकांची मुख्य समस्या असलेली पाणी पुरवठ्याबाबत कोणतीही ठोस कामे गेल्या ५० वर्षांपासून झालेले नाही. आज भर पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या शहरात आहे. याची सामाजिक जाणीव ठेवत संपूर्ण पाठपुरावा, आंदोलन, संघटन, पत्रव्यवहार आदी करून धरणगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी धरणगाव जागृत जनमंच चे शिवराम पाटील यांच्या वतीने लवकरच धरणगाव जागृत जनमंच ची स्थापना करण्यात येणार असल्याचे शिवराम पाटील यांनी सांगितले.
धरणगाव शहरातील नागरिकांना आवाहन
धरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांना धरणगाव जागृत जनमंच सोबत येण्यासाठी शिवराम पाटील यांनी आवाहन केले आहे. सदर संघटना सामाजिक व गैर राजकीय असल्याने कुणीही व कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते आमच्याशी संपर्क करू शकतात. तसेच धरणगाव शहरासाठी लोकनायक न्यूज चे संपादक जितेंद्र महाजन यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन शिवराम पाटील यांनी केले आहे.