नाशिक (वृत्तसंस्था) पूर्व वैमनस्यातून पाच-सहा जणांच्या टोळक्याने चॉपरसह धारधार शस्त्रांने सपासप वार करीत तरुणाची हत्या केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २४) शिवाजी चौकात घडला. संदीप प्रकाश आठवले (वय २३, रा. पेलिकन पार्कजवळ, नवीन नाशिक), असे मयत भाजी विक्रेत्या तरुणाचे नाव आहे.
संदीप आठवले हा त्याचा चुलत भाऊ सनी आठवले सोबत छत्रपती शिवाजी चौक, शॉपींग सेंटर येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाणी पुरी खाण्यासाठी आला होता. याच वेळी पाच ते सहा जणांचे वैमन्यस्यातून टोळके दोन मोटारसायकलवरून तेथे आले. त्यांनी संदीपला गाठत जणांच्या अचानक त्याच्या पाठीवर व टोळक्याने पोटावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात संदीप रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच गतप्राण झाला.
बघ्यांची गर्दी जमा होऊ लागताच संशयित टोळक्याने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या समवेत अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली. यातील काही संशयित आरोपी निष्पन्न झाले असले तरी रात्री उशिरापर्यंत त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नव्हती. फरार संशयित मारेकऱ्यांच्या शोधासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, सनी आठवले याच्या तक्रारीवरून अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप आठवले याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, संशयित हल्लेखोर ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी (१९, रा. पाथर्डी फाटा), साईनाथ मोरताठे उर्फ मंगी मोया (२०). ओम चौधरी उर्फ छोटा खटकी (२०, दोघे रा. सिडको), अनिल प्रजापती बाळा वडनेरे यांना एमआयडीसी चुंचाळे पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोहर कारडे, उपनिरक्षक संदीप पवार, जनार्धन ढाकणे, सुरेश जाधव, किरण सोनवणे यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या तसेच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे