धरणगाव (प्रतिनिधी) गौतम नगर येथील नागसेन भन्ते यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी नागवंशीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन सोनवणे व कैलास पवार यांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या मूर्तीचे व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
धम्म परिषदेत प्रवचन करताना भन्ते नागसेन म्हणाले की, मनात क्रोध भावना ठेवू नका वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका हाच बौध्द जीवनमार्ग आहे. ज्याप्रमाणे सोनार क्रमाक्रमाने चांदीतील अशुध्दतेला जाळून टाकतो त्याप्रमाणे मनुष्याने क्रमाक्रमाने चित्ताचे विकार नष्ट करावेत. तसेच ज्याप्रमाणे समाजात दु:ख निर्माण होते तसेच त्याचे निवारन सुद्धा करता येते असे ते म्हणाले. तसेच भन्ते गुनदंत महाथेरो ,भन्ते महानाम, भन्ते गुनानंद , भन्ते महामोगल्यान यांनी देखील प्रवचन दिले. कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे व शुध्दोधन सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी गौतम नगरमधील रहिवासी व सिद्धार्थ मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले. आभार दिपक वाघमारे यांनी मानले.