जळगाव (प्रतिनिधी) आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठेला आणि स्वदेशी उत्पादनांना बळ देण्यासाठी जळगाव शहरात एक विशेष जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘स्थानिक व्यापारीकडून खरेदी करूया, जळगावची बाजारपेठ वाचवूया!’ या संदेशासह स्वदेशी जागरण मंच, रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ आणि महादेव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या हस्ते शुभारंभ
या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या हस्ते गोलाणी मार्केट येथे दुकानांवर आणि दर्शनी भागात जनजागृती करणारे पोस्टर चिकटवून या अभियानाची सुरुवात झाली.
शहरात लावणार पोस्टर, बॅनर
शहरातील नागरिकांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करावी आणि स्वदेशी व भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य द्यावे, असे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी शहरात सर्वत्र पोस्टर आणि बॅनर लावले जाणार आहेत. स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, तसेच छोटे-मोठे व्यापारी आणि कारागीर यांना आधार देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा महानगरअध्यक्ष दीपक सूर्यवंशी, चंदन कोल्हे, रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थचे प्रेसिडेंट बिपीन पाटील, सचिन पाटील, क्षितिज भालेराव, आशिष सपकाळे, स्वदेशी जागरण मंचचे चेतन वाणी, पिंटू लुल्ला आदींसह स्थानिक दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
	    	
 
















