
भुसावळ, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सेवा संपर्क अभियानांतर्गत वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एकूण ४९ ज्येष्ठ नागरिकांना “जेष्ठ नागरिक ओळख”कार्डांचे भुसावळ तहसीलदार नीताताई लबडे आणि भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दिपाली जगताप यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित “वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची” मासिक सभा रिंग रोड,भुसावळ या ठिकाणी झाली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ तहसीलदार नीताताई लबडे सोबत मातोश्री, भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दिपाली जगताप,प्रकाश पाटील, सतिश जंगले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विश्व प्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने झाली.
तहसीलदार नीताताई लबडे आणि भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दिपाली जगताप यांच्या शुभहस्ते कार्ड जेष्ठ नागरिकांना वितरण करण्यात आले.
पोलीस निरीक्षक दिपाली जगताप यांनी ज्येष्ठ नागरिकांनी सायबर गुन्हेगारीपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीविषयी मार्गदर्शन केले. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय तपशील देऊ नयेत. बँकेच्या नावाने फोन करून वैयक्तिक माहिती मागणाऱ्यांपासून सावधन राहावे.ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार ओळखणे, अनोळखी फोन व संदेशांवर विश्वास न ठेवणे आणि आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे, यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात ज्येष्ठत्वाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेशही देण्यात आला. वयाची साठी ओलांडलेल्या व्यक्तींनी स्वतःला वृद्ध न समजता अनुभवाने समृद्ध ज्येष्ठ नागरिक समजावे, असे प्रतिपादन तहसीलदार नीताताई लबडे यांनी केले. आपले आरोग्य आपल्या हातात असून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन इतरांवरील अवलंबित्व कमी करावे. तसेच आनंदी जीवन जगण्यासाठी कृतज्ञतेची भावना अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय ओळख पत्र मिळाल्याने जेष्ठ नागरिक यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. जी. पाटील यांनी तर सूत्रसंचालन सतीश जंगले यांनी केले. शेवटी सर्व उपस्थितांनी एकाच स्वरात ‘धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद’ असे म्हणत सामूहिकरीत्या आभार व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमातील नियोजन, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनोख्या पद्धतीचे दोन्ही मान्यवर अधिकाऱ्यांनी संघाचे कौतुक केले.महाराष्ट्र शासनाच्या सेवा संपर्क अभियानांतर्गत झालेल्या या कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच आरोग्य, स्वावलंबन आणि आनंदी जीवनाचा संदेश देण्यात आला.















