अंबाजोगाई (वृत्तसंस्था) अंबाजोगाई-लातूर महामार्गावरील पाचपीर दर्गाजवळ रविवारी पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चौघेही जागीच ठार झाले. सर्व मृत लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहिवासी आहेत.
आत्माराम माधवराव बानापुरे (५४), माधव खलंग्रे (५८), सौदागर किसन कांबळे (५०), शिवराज डोम (६१, रा. व्यंकटेशनगर, लातूर) अशी मृतांची नावे आहेत. जगलपूर (ता. चाकूर, जि. लातूर) येथील हे चौघे सोसायटीच्या कामानिमित्त शनिवारी रात्री उशिरा स्विफ्ट कारने लातूर- अंबाजोगाई महामार्गाने छत्रपती संभाजीनगरला निघाले होते. रात्री धुवांधार पाऊस सुरू होता. त्यामुळे समोर धुके पडले होते. रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बर्दापूरनजीकच्या पाचपीर दग्र्याजवळ कार व हैदराबादकडे जाणाऱ्या कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यावेळी कार कंटेनरखाली घुसल्याने कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. चालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, कंटेनरचालक काशिनाथ केदार (रा. केज) यास बर्दापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी दुपारनंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. बर्दापूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेची माहिती कळताच जगलपूर गावावर शोककळा पसरली होती.