मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका करताना ‘आम्ही तुमचे बाप आहोत’ असा घणाघात केला होता. यानंतर काल पाटील यांनी, ‘यांच्या बापाची पेंड आहे का?’ म्हणत पुन्हा एकदा ‘बाप’ काढला होता. अशातच आता चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीनेही चंद्रकांत पाटील यांचा ‘बाप’ काढत पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलं आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून चंद्रकांत पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे. शिंदे यांनी, “चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात.’ अशी टीका करत चंद्रकांत पाटील व मोदींना लक्ष्य केलं.
तर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विधानावर खुलासा केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, “बापाची पेंड हा सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे. त्या शब्दाचा मी वापर केला. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. मी कुणाचाही बाप काढला नाही” अशी सारवासारव केली आहे.