जळगाव (प्रतिनिधी) पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सुधारीत करण्यात आल्या आहेत. कामकाजाच्या वेळा संबंधीचे या पुर्वीचे सर्व आदेश, परिपत्रके या आदेशान्वये रद्द करण्यात आले असून सुधारीत कामकाजाच्या वेळा दिनांक ७ जानेवारी, २०२१ पासून अंमलात आणण्यात येत आहेत.
पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत असलेले राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे दररोज दोन सत्रात चालु असतात. पशुपालकांच्यादृष्टीने या वेळा गैरसोयीच्या ठरत असल्याने त्यामध्ये सुधारणा करणेबाबत अनेक संघटना तसेच विविध ग्रामपंचायतीकडुन निवेदने, विनंती अर्ज खात्यास प्राप्त होत आहे. त्याद्वारे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सलग असाव्यात अशी मागणी होत होती. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.०० ते दुपारी ४.३० वा. (जेवणाची सुट्टी दुपारी १.०० ते १.३० वाजेपर्यंत) आणि शनिवार सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सुरू राहतील. पशुपालकांना आकस्मिकप्रसंगी २४ तास सेवा उपलब्ध राहणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.