जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जळगाव अंतर्गत तालुकास्तरावर कार्यरत तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, शिपाई, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या नुकत्याच जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून तडकाफडकी बदलीचे आदेश काढून कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीने लादण्यात आले असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
दिनेश भोळे यांनी आपल्या तक्रारी म्हटले आहे की, सदर आदेशात राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाचे कार्यालयीन परिपत्रक दि २४ फेब्रुवारी २०२२ व मनुष्यबळ संसाधन पुस्तिकेत नमुद मार्गदर्शन सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात आलेले नाही. प्रशासकीय बदल्या करण्याबाबत राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाकडून कुठल्याही सुचना नसतांना रिक्तपदांवरील विनंती बदल्यांच्या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सोईचे कारण दाखवून आदलाबदल करण्यात आले आहे.
मिनल कुटे यांनी नियमबाह्य व बेकायदेशीर बदल्या केल्या !
प्रकल्प संचालक मिनल कुटे यांनी विनंती नसलेल्या तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक यांची कोणतेही पूर्वसूचना न देता मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव यांच्याकडे बदल्या प्रस्तावित करुन २७/०५ / २०२२ रोजी तडकाफडकी बदली आदेश प्रसिद्ध केले. यातील काही प्रभाग समन्वयक है मार्च २०२० पासून नियुक्त झालेले असून नियुक्तीस अल्पकाळ झालेला आहे.. जिल्हा कक्षातील जिल्हा व्यवस्थापक या पदांवर तालुका व्यवस्थापक अनिल बडगुजर पाचोरा, राहुल ठोसरे भुसावळ, महेंद्र लांबोळे पारोळा यांना कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पदभार असे नमूद न करता जिल्हा व्यवस्थापक या पदावर उड्डाण पदोन्नतीने कायमस्वरूपी पदस्थापना करण्यात आलेल्या आहेत. तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष जळगाव येथील डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई सचिन पांढारकर व प्रदीप बारेला है तालुकास्तरावरील नियुक्त कर्मचारी असतांना त्यांची जिल्हा कक्षातील पदांवर बदली करण्यात आली आहे. वरील नमूद व्यक्ती मीनल कुठे त्यांच्या मर्जीतील असल्यामुळे त्यांची जिल्हा कक्षात नियुक्ती केली आहे. हा बदली आदेश नियमबाह्य व बेकायदेशीर असून येथील कर्मचाऱ्यांची मानसिक पिळवणूक होत आहे.
घेता सुडबुद्धीने बदल्या प्रस्तावित करून मंजुरी घेतल्याचा आरोप !
जळगाव येथील अभियानाच्या इनटेनसिव्ह पद्धतीने अंमलबजावणी पासून आजपावेतो अधिक काळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) किशोर राणे यांच्याकडे लेखाधिकारी (उमेद) हा पदभार आहे. तसेच सद्यस्थितीत जिल्हा अभियान व्यवस्थापक हा अतिरिक्त पदभार देखील किशोर राणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मीनल कुटे यांनी किशोर राणे यांच्या सल्ल्याने कर्मचाऱ्यांची कोणतेही सोय विचारात न घेता सुडबुद्धीने बदल्या प्रस्तावित करून मंजुरी घेतली असून येथील कर्मचाऱ्यांना प्रकल्प संचालक मिनल कुटे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया हे विनंतीला दाद देत नसून कर्मचाऱ्यांना दाबून मारले जात आहे.
अभियानासाठी प्राप्त निधीत आर्थिक भ्रष्टाचार
जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षात अभियानासाठी प्राप्त निधीचा आर्थिक भ्रष्टाचार देखील मीनल कुटे व यापूर्वी नियुक्तीस असलेले प्रकल्प संचालक तसेच किशोर राणे व जिल्हा व्यवस्थापक संपादणूक श्री. लोकेश जोशी यांच्या संगनमताने गेल्या काही वर्षापासून सर्रास सुरू असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे या सर्व बाबींचा अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीवर विपरीत परिणाम होत आहे. या सर्व बाबींची गंभीर दखल घ्यावी व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जळगाव येथील अनागोंदी कारभार व मुजोरी बाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी विनंती देखील श्री. भोळे यांनी केली आहे.