पाचोरा (प्रतिनिधी) ऑनलाइन गेम खेळून मोठ्या प्रमाणात पैसे जिंकता येतील, असे वचन देत शासकीय ठेकेदार रोशन पदमसिंग पाटील (वय २७, रा. पाचोरा) यांना ७८ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही घटना ३ नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसाठी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा येथील शासकीय ठेकेदार रोशन पाटील यांना ३ नोव्हेंबरपासून दोन जणांनी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून एका वेबसाइटवरील ‘अंदर बाहर’ आणि ‘अंदर बाहर २’ या गेमद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे जिंकता येतील, असा दावा केला. त्यानुसार, पाटील यांनी गेम खेळण्यास सुरुवात केली, आणि त्यांना जिंकल्याचे भासवून सात लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले. यामुळे त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. नंतर, आणखी पैसे गुंतविण्याचे अमिष दाखवून त्यांना अधिक पैसे गेम मध्ये गुंतवायला सांगितले. त्यानुसार, पाटील यांनी वेळोवेळी पैसे गुंतवले आणि त्यांच्याकडून एकूण ७८ लाख ९० हजार ५०० रुपये स्वीकारण्यात आले.
नंतर, हे पैसे गमावल्याने त्यांना ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पैसे मिळवणे शक्य नसल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली, आणि यावरून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.