मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका करत असतात. मात्र, आज एक वेगळेच चित्र पहायला मिळाले. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याचं कळतंय.
आज सकाळीच छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळेस या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याचं कळतंय. ओबीसींच्या विविध प्रश्नांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. भुजबळ यांनी फोटो पोस्ट करत या भेटीची माहिती दिली आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘ओबीसीं’च्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने चार मार्च २०२१ रोजी स्थगिती दिली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे पेचप्रश्न निर्माण झाला आहे. आता राज्य सरकारला ‘ओबीसीं’बाबत ‘इम्पिरिकल डेटा’ हा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. केंद्र सरकारकडून ही माहिती राज्य सरकारला मिळालेली नाही. केंद्र सरकारने ही माहिती राज्य सरकराला द्यावी यासाठी सरकार पाठपुरावा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची ही भेट महत्त्वाची मानली जाते.