मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपने टीकास्त्र सोडल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा वेग चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता. ते खरंच देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, अशी टिप्पणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या चक्रीवादळानंतरच्या कोकण दौऱ्यावर टीकास्त्र सोडले आहे. संदीप देशपांडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.’
संदीप देशपांडे यांनी काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातच्या पुढे दिसत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या पुढे दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही, असं भाष्य देशपांडे यांनी करत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौत्के चक्रीवादळामुळे हानी झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता. मात्र, विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या या धावत्या भेटीवर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्र्यांनी विमानतळापासून मोजून १० किलोमीटर अंतरावरील भागांची पाहणी केली. आतमध्ये जाऊन कुठल्याही गावाला भेट दिली नाही. ‘यालाच म्हणतात “lipstick” दौरा, अशी खरमरीत टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती.
















