चाळीसगाव (प्रतिनिधी) जवळपास ७ गावांचे हजारो ग्रामस्थ व मोठ्या प्रमाणावर उस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा मात्र प्रचंड दुरावस्था झालेल्या चाळीसगाव – कोदगाव – बेलदारवाडी – वलठाण – पाटणादेवी या रस्त्याचे भाग्य अखेर आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने बदलणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या सदर १२.६ किमी रस्त्याच्या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला असून या बातमीमुळे अतिशय आनंदाचे वातावरण या भागातील गावांमध्ये निर्माण झाले आहे. तसा शासन निर्णय देखील प्रसिद्ध झाला असून लवकरच निविदाप्रक्रिया होऊन कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली असून या कामासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीषभाऊ महाजन व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत.
ही गावे जोडली जाणार विकासाच्या प्रवाहात…
कोदगाव, बेलदारवाडी, गणपूर गाव व गणपूर तांडा, शामवाडी, ३२ नंबर तांडा, वलठाण व पाटणादेवी गावातील ग्रामस्थांना या रस्त्याचा फायदा होणार असून ते विकासाच्या प्रवाहात जोडली जाणार आहेत.
श्रीक्षेत्र सिद्धेश्वर आश्रम तीर्थक्षेत्रासह परिसरातील हजारो उस उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा..!
बेलदारवाडी, गणपूर व गणपूर तांडा, कोदगाव या गावांना चाळीसगाव येथे येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे तसेच बेलदारवाडी येथे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर आश्रम असून तेथे दरवर्षी हजारो भाविक भक्त भेट देत असतात. त्यांची देखील मोठी गैरसोय आता दूर होणार आहे. तसेच वलठाण व कोदगाव धरण क्षेत्रातून हा रस्ता जात असल्याने सदर भागातील उस उत्पादक शेतकऱ्यांना आपला उस कारखान्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता त्यांना पक्का रस्ता मिळणार आहे.
















