जळगाव (प्रतिनिधी) पिलखेडे गावाशी जुने ऋणानुबंध असून त्यांना उजाळा देत शाळेच्या आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच शाळेत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा पालकमंत्र्यांनी आनंद घेवून विद्यार्थाना देखील प्रोत्साहित केले. शिक्षकांची मेहनत आणि गावकऱ्यांचा लोकसभागामुळे शाळेचे रूपडे पालटले असून “माझी शाळा – सुंदर शाळा ” या उपक्रमांतर्गत शाळेने विभागस्तर किंवा राज्यस्तरावर नावलौकिक मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
जळगाव तालुक्यातील पिलखेडे गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समस्त गावकऱ्यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा पिलखेडे येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. जळगाव तालुक्यातून पिलखेडे शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शनिवारी दप्तरमुक्त शाळा , मी इंग्रजी वाचणार बोलणार प्रश्न मंजूषा ,अनेक उपक्रम राबविले जातात. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेवून प्रशासनाकडून या शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र आदर्श शाळा घोषित होवून देखील निधी लागणारा निधी प्राप्त होत नव्हता. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांतून पिलखेडे सहीत जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून निवड झालेल्या सर्व शाळांना मागील काही दिवसात १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात पिलखेडे शाळेला ८४.७६ लाख रु. मंजूर करण्यात आले आहेत. पालकमंत्री यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले म्हणून सर्व ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बोलावून जाहीर नागरी सत्कार केला.
कलागुणांनी मान्यवर भारवले !
शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत म्हटले. “रंगतरंग या कार्यक्रमात शाळेच्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कलागुण या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केले. उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ विद्यार्थ्यांच्या या कलागुणांमुळे भारावून गेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. बहारदार सूत्रसंचालन शरद राजहंस यांनी केले तर आभार उपशिक्षिका मनिषा मारकड यांनी मानले.
यांची होती उपस्थिती !
यावेळी शिक्षण विस्तारअधिकारी जितेंद्र चिंचोले , केंद्रप्रमुख विनोद चव्हाण, अजय शिरसाठ , महेंद्र वाणी, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, सरपंच रोहिणी साळुंके, उपसरपंच अमोल चौधरी, वि.का.स. सोसायटी चेअरमन रामकृष्ण चौधरी व सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र साळुंके व सदस्य, मुख्याध्यापक दशरथ वाघ, शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, मंगलदास भोई, शरद राजहंस, संतोष वानखेडे, शिक्षिका मिरा सनेर, मनीषा मारकड , ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















