भुसावळ (प्रतिनिधी) मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांच्या जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारणीचे आंदोलन आता अंतीम विजयी टप्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आणि त्यानंतर झालेल्या भूमीपूजन समारंभानंतर आता मंदिर निर्माण कार्याला सुरुवात झाली आहे. यासाठी येत्या मकरसंक्रांती पासून एक महिन्यात विशेष अभियान घेण्यात येणार असून संघ दृष्ट्या भुसावळ मधील २ लाख घरांशी संपर्क साधून त्यांच्या कडून खारीचा वाटा जमा करण्यात येणार आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने स्थापनकेलेल्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने अयोध्येतील नियोजित जागेत भूमिपूजन सर्व ट्रस्टी व धर्माचार्य यांच्या इच्छेनुसार पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. भव्य मंदिराची उभारणी करताना त्यात देशातील गावोगावच्या अधिकाधिक नागरिकांचे योगदान व्हावे आणि त्यांच्या भावना जोडल्या जाव्यात या हेतूने येत्या मकर संक्रांति पासून महिनाभरात घरोघरी जावून रामभक्त कार्यकर्ते निधी समर्पण जमा करणार आहेत. जमेल तेवढा निधी प्रत्येक कुटुंबाला समर्पित करता यावा यासाठी दहा, शंभर व हजार रुपयांची कुपन्स कलेक्ट असेल तर काढण्यात आली असून त्यावर असलेले नियोजित श्रीराममंदिराचे आकर्षक चित्रही त्या कुपन मुळे घरोघरी जाणार आहे.
या अभियानासाठी आजवर जिल्हा व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. त्यामध्ये आठ तालुक्यातील ९७१ संख्या उपस्थित होती आणि यापुढे अभियान सुरू होण्याआधी वस्तीशः व गावश: बैठका घेण्यात आल्या व आणखी घेणार आहेत. या अभियानात भुसावळ जिल्ह्यातील २ लाख कुटुंबांपर्यंत संपर्क करण्यात येणार आहे. यात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. हे अभियान भुसावळ जिल्ह्यात १४ जानेवारी पासून १५ फेबुवारीपर्यंत चालणार आहे. या अभियानाच्या आधी तयारीसाठी मराठवाडा आणि खानदेशात सात ठिकाणी धर्माचार्य संमेलन होणार आहेत. ३ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान विविध भागात ही संमेलने होणार आहेत. या संमेलनामध्ये त्या त्या भागातील धर्माचार्य सहभागी होतील. अभियानकाळात या धर्मचार्यांच्या उपस्थितीत कोरोना काळातील संखेची मर्यादा पाळून शंभर ते दीडशे लोकांचे मेळावे घेण्यात येतील. या मेळाव्यात भजन, कीर्तन, प्रसादवाटप असे स्वरूप असेल.
हे संपर्क अभियान देशभर केले जाणार असून देशातील चार लाख गावातील ११ कोटी कुटुंबापर्यंत रामभक्त संपर्क करतील. यामध्ये सर्व पंथ, सर्व संप्रदाय, सर्व जाती, क्षेत्र, भाषा अशा सर्व देशवासीयांशी संपर्क करून त्यांचा खारीचा वाटा श्रीराम मंदिर निर्माणात घेण्याचा विचार यामागे आहे. यामध्ये केवळ निधीच नाही तर रामभक्तांनी त्यांचा वेळही द्यावा असे आमचे आवाहन आहे.
श्रीराममंदिर निर्माणासाठी मुंबई, दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी येथील आयआयटी तसेच सीबीआरआय रूरकी व एल अँड टी व टाटा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस येथील तंत्रज्ञ मंदिराच्या मजबूत पायासाठी विचार करत असून लवकरच त्याचे स्वरूप अंतीम होईल. मंदिराची लांबी ३६० फूट व रुंदी २३५ फूट असणार असून प्रत्येक मजला २० फूट उंचीचा असणार आहे. देशातील नव्या पिढीला श्रीरामजन्मभूमी मंदिराचा इतिहास ज्ञात व्हावा यासाठी या अभियानात घरोघरी जाऊन हा इतिहास सांगितला जाईल यात देशाच्या कानाकोपऱ्या पर्यत सर्व भागात रामभक्त संपर्क करणार आहेत.
या अभियानासाठी संघ दृष्ट्या भुसावळ जिल्हा पातळीवर श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष स्थानी महामंडलेश्वर महंत श्री जनार्दन हरीजी महाराज हे राहणार असून या समितीच्या अन्य पदाधिकारी सदस्यांची नावे सोबत देत आहोत. यावेळी जनार्धन महाराज, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, पालकमंत्री नारायण घोडके, राष्ट्रीय स्वसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. विजय सोनी आदी उपस्थित होते.