नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बोगस कागदपत्रांद्वारे यूपीएससीची फसवणूक करणाऱ्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने खेडकर हिला आयएएस सेवेतून तत्काळ बरखास्त केले आहे. महिनाभरापूर्वीच केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) खेडकर हिची उमेदवारी रद्द केली होती.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन आणि कागदपत्रांमधील कथित अनियमिततेवरून वादात अडकल्यानंतर यूपीएससीने २०२३ च्या बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. बोगस ओबीसी प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर आरक्षणाचा लाभ घेत आयएएस पद मिळविल्याचा आरोप तिच्यावर आहे. यूपीएससीच्या कारवाईनंतर आता केंद्र सरकारने देखील खेडकरला तत्काळ सनदी सेवेतून बरखास्त केले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेच्या नियमानुसार सरकारला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांवर कारवाई करता येते. यापूर्वी यूपीएससीने केलेल्या तपासात खेडकर हिने सनदी सेवा परीक्षा-२०२२ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले होते. यानंतर दिल्ली पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यूपीएससीने ३१ जुलै रोजी खेडकर हिची उमेदवारी रद्द करण्याबरोबरच तिला भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यास मज्जाव केला होता. दरम्यान, खेडकरने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात एम्समध्ये वैद्यकीय तपासणीसाठी हजर राहण्याची तयारी दर्शवली होती. पोलिसांनी खेडकरने दाखल केलेले दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केल्यानंतर तिने वैद्यकीय तपासणीची तयारी दाखवली होती.