जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेंदुर्णी येथे इंस्टाग्रामवरील टाकलेल्या पोस्टवरील कमेंटमुळे उठलेल्या वादातून दोन्ही गटांमध्ये दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत, पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली.
या संदर्भात अधिक असे की, शेंदुर्णी येथील एका व्यक्तीने दुपारी इंस्टाग्रामवर आलेली पोस्ट व्हायरल केली. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका दुसऱ्या गटातील व्यक्तीने आक्षेपार्ह कमेंट केली. संबंधित एकीने ही कमेंट इतरांना दाखवत शेंदुर्णी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मात्र, सोशल मीडियावरील पोस्ट व त्यावरील वाद हा आयटीसीचा विषय असून तपासणी झाल्यानंतर गुन्हा दाखल होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
याच दरम्यान दोन्ही गटाकडून मोमीन गल्लीत दगडफेक झाली. त्यामुळे काही वेळ धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, गावातील पदाधिकारी, तहसीलदार अरुण शेवाळे, चाळीसगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभयसिंह देशमुख, संजय गरूड, उत्तम थोरात यांनी घटनास्थळी धाव घेऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.














