जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या महासभेस नगरसेविका वैशाली अमित पाटील (प्रभाग क्र. १३) यांनी वैद्यकीय कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे उपस्थित राहण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.
महापौर दीपमाला काळे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, दिनांक ४ एप्रिल रोजी मुंबई येथील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सभेला उपस्थित राहणे सध्या शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महासभा प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्याची तरतूद असली, तरी विशेष परिस्थितीत स्थानिक प्रशासनास आवश्यक त्या सवलती देण्याचे अधिकार आहेत. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होण्याची पद्धत मान्य करण्यात आलेली असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. आपली वैद्यकीय अडचण ही अपवादात्मक असल्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी व प्रभाग तसेच शहरातील प्रश्न मांडण्यासाठी VC द्वारे सहभागी होण्यास विशेष परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली आहे.
दरम्यान, नगरसेविका वैशाली पाटील यांनी यापूर्वीही महापालिकेच्या सभांमध्ये आपल्या प्रभागासह शहराच्या विविध प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली आहे. विशेषतः गाळ (नालेसफाई) व्यवस्थापन आणि ओपन स्पेसच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. पायावरील शस्त्रक्रियेमुळे त्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.














