
जळगाव (प्रतिनिधी) – नदीपात्रासह जंगलामध्ये अवैधरित्या तयार केल्या जाणाऱ्या हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांसह नदीपात्रातून वाळूचा उपसा करुन त्याची चोरटी वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. बुधवार दि.१९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे व पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दुचाकीसह पायी नदीपात्रात उतरुन परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना झिरो टॉलरेंसची भूमीका ठेवण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंदे चालकांविरुद्ध जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर काम करीत आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांसह वाळूचा उपसा करुन त्याची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली आहे. या कारवाईच्या अनुषंगाने जिल्ह्यात दिवभरात नदीपात्रासह जंगलात सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्या भट्ट्या उद्धवस्त करुन मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. तसेच दारु विक्रेत्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.
मध्यरात्री वाळू माफियांवर कारवाईचा धडाका
हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांसह पोलिसांनी नदीपात्रातून वाळूचा बेसुमार उपसा करुन त्याची मध्यरात्रीच्या धरणगाव पोलिसांनी वाळू वाहतुक करणाऱ्या चालक शालीक संजय चव्हाण (वय २६) व विवेक शेषराव सपकाळे (वय २४, रा. नारणे, ता. धरणगाव), सावदा पोलिसांनी सुरेश जगन्नाथ सोनवणे (वय ४८, रा. पिंपरुड, ता. यावल), रावेर पोलिसांनी आमीन शब्बीर तडवी (वय २२, रा. पाल, ता. रावेर), अकील लतीब तडवी (रा. पाल, ता. रावेर) तसेच ममुराबाद ते खेडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात वाळू वाहतुक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी रोहन घुगे व पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तालुक्यातील खेडी, कानळदायासह अनेक ठिकाणावरील नदीपात्रात दुचाकी व पायी जावून पाहणी केली. तसेच ग्रामस्थांची चर्चा करुन त्यांनी वाळु वाहतुक रोखण्याविषयी चर्चा केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करुन त्यांना वाळू माफियांविरुद्ध कठोर कारवाईची भूमीका घेण्याच्या सूचना देत वाळू संदर्भात झिरो टॉलरेंची भूमीका ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
राज्यात सर्वाधिक दंडवसुली
गेल्या वर्षभरात जळगाव महसूल प्रशासनाने अवैध वाळू व इतर कारवायांमधून राज्यात सर्वाधिक दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात सुमारे ७०० पेक्षा अधिक कारवाई करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात अवैध कारवाई व रॉयल्टीमधून राज्यात सर्वांधिक सुमारे १३५ कोटी रुपयांचा महसूल शासनास मिळाला होता. त्यामुळे आता जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर होणारी पुढील कारवाई अधिक आक्रमक असण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात अवैध वाळूविरोधातील कारवाई सुरू आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. यापुढेही अवैध वाळू उपशावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आजच्या पाहणीनंतर अवैध साठा आढळला असून, त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – रोहन घुगे, जिल्हाधिकारी,

















