भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ एसबीआय आनंद नगर शाखेत पुन्हा एकदा कोट्यावधीचा कर्ज घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल २६ संशयित आरोपी आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी देखील गृहकर्ज घोटाळ्यात १७ जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात ऑक्टोंबर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सहा महिन्यांच्या चौकशीनंतर दोन शाखा अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. ‘द क्लिअर न्यूज’ने याबाबत सातत्याने वृत्त प्रकाशित केले होते.
याबाबत पहिल्या फिर्यादीत मनोज प्रेमदास बेलकर यांनी म्हटले आहे की, १७ जून २०१९ ते २७ डिसेंबर २०२० च्या दरम्यान, संशयित आरोपी गफ्फार अली मोहम्मद अली, तौफिक खान मुसा खान, तौसिफ खान महेमुद खान, रईसाबी गंभीर शाह, निलोफरबी तौफिक खान, कोसरखान यासीन खान, यास्मीनवी अजीज खान, तनवीर फत्तु तडवी, पुनम भिमराव जाधव, (सर्व रा. भुसावळ), हे ९ जण हे गृहकर्ज घेण्यास पात्र नसतांना त्यांनी तत्कालीन बैंक व्यवस्थापक नंदलाल पाटील आणि व्हॅल्युअर १] अशोक एम.दहाड (रा.जळगाव), एस.एम.शिंदे, आणि समीर बेले (रा. नाशिक) यांच्याशी आपआसात संगणमत करुन व बँकेची फसवणूक करण्याच्या उददेशाने त्यांनी आयटीआर व व्हॅल्युएशन रिपोर्ट आदी खोटे व बनावट दस्तऐवज तयार केले. तसेच सदरचे खोटे व बनावट दस्तऐवज हे गृहकर्ज प्रकरणात बँकेत दाखल करुन एकूण १,३७,९९,३००/- (एक कोटी सदोतीस लाख नव्यान्नऊ हजार तीनशे] एवढी रक्कम बेकायदेशीरपणे गृहकर्ज स्वरुपात प्राप्त करुन कर्जदार यांनी सदर रकमेची परतफेड केली नाही. तसेच कर्जदार यांनी ज्या प्रयोजनासाठी कर्ज घेतले त्या प्रयोजनासाठी त्याचा वापर न करता सदरची रक्कम स्वत:चे आर्थिक फायदयाकरिता वापरुन बँकेशी विश्वासघात करून बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे. अशा एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या फिर्याद देखील मनोज प्रेमदास बेलकर यांनीच दिली आहे. त्यानुसार २२ मार्च २०१८ ते १६ जून २०१९ च्या दरम्यान, महेश देविदास तायडे , प्रतिभा गोपाल सोनवणे, हबीब शाह गंभीर शाह, जितेंद्र गंगाधर पाटील, सुल्तानाबी अहमद कुरेशी,फरजनाबी महेमूद खान पठाण, गणेश किसन तेली, शोएब रजा शेख साजिद, हसिनाबी अब्बास शहा, नदीम खान सुलतान खान (सर्व रा.भुसावळ) गृहकर्ज घेण्यास पात्र नसतांना त्यांनी तत्कालीन बँक व्यवस्थापक विशाल इंगळे आणि व्हॅल्युअरएस. एम. शिंदे यांचेशी आप आसात संगणमत करुन व बँकेची फसवणूक करण्याच्या उददेशाने त्यांनी आयटीआर व व्हॅल्युएशन रिपोर्ट इ. खोटे व बनावट दस्तऐवज तयार केले. तसेच सदरचे खोटे व बनावट दस्तऐवज हे गृहकर्ज प्रकरणात बँकेत दाखल करुन एकूण १,४०,०१,०००/- [एक कोटी चाळीस लाख एक हजार ] रक्कम बेकायदेशीरपणे गृहकर्ज स्वरुपात प्राप्त करुन कर्जदार यांनी सदर रकमेची परतफेड केली नाही. तसेच कर्जदार यांनी ज्या प्रयोजनासाठी कर्ज घेतले त्या प्रयोजनासाठी त्याचा वापर न करता सदरची रक्कम स्वत:चे आथिर्क फायदयाकरिता वापरुन बँकेशी विश्वासघात करुन बँकेची आथिर्क फसवणूक केली आहे. या गुन्ह्यात देखील एकूण १३ संशयित आरोपी आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सपोनि हरीश भोये हे करीत आहेत.
याआधीही दोन गुन्हे आहेत दाखल
स्टेट बँकेच्या आनंद नगर शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी २०१८ मध्ये १७ जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गृहकर्ज घेताना मिळकती नसतानाही इमला खरेदीसाठी सौदा पावती खोट्या करून १७ जणांनी सुमारे दीड कोटींपेक्षा अधिक रुपयात फसवणूक केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली होती. तर महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातून व्यवसासाठी बोगस लाभार्थ्यांच्या नावे ७०२ प्रकरणात ६७ बँकांमधून तब्बल ६.५० कोटीचा अपहार केल्याचा गुन्हा २०१८ मध्ये जळगाव रामानंद पोलिसात दाखल होता.
दोन शाखा अधिकारी आहेत निलंबित !
मुंबई येथील स्टेट बँकेचे नरिमन पॉइंट (मुंबई) येथील जनरल मॅनेजर यांनी एप्रिल २०२१ मध्ये विशाल इंगळे (आनंद नगर शाखा ब्रांच मॅनेजर) वर्ष 2018-19 या कार्यकाळात दिलेले कर्ज प्रकरणात तसेच नंदलाल पाटील (आनंद नगर शाखा ब्रांच मॅनेजर) 2019-20 या कार्यकाळात झालेले कर्ज प्रकरणाबाबतीत दोषी ठरवून दोघांचे निलंबनाचे केले होते.
२०१८ मध्ये ६.५० कोटींचा अपहार
महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत गरीब गरजूंना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. महामंडळाने पाठवलेल्या लाभार्थींच्या प्रकरणांवर कर्ज मंजूर झाल्यास संबधीताच्या वैयक्तीक स्टेट बॅंकेतील खात्यात कर्जाची रक्कम वर्ग होऊन कर्जाचे खाते सुरू केले जाते व त्यातूनच फेड करायची असते. परंतू या प्रकरणात बनावट लाभार्थीसह सर्वच कागदपत्र बनावट सादर करून साधार ६७ बँकांमधून ७०२ वेगवेळ्या प्रकरणात प्रत्येकी ९० हजार असा ६.५० कोटीच्या सबसिडीचा अपहार केल्याप्रकरणी महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकानी ४ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बोगस लाभार्थ्यांचे नावाने कर्ज मंजूर करण्यासह बँकेचे बनावट दस्तऐवज तयार करून सबसिडीची रक्कम वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या प्रकरणात काही व्यक्तीच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासाला आता आर्थिक गुन्हे शाखेकडून वेग आला असून याप्रकरणात आणखी काही आरोपी वाढणार आहेत.
गुन्ह्याची एकच मोडस ऑपरेंडी आणि एकच टोळी !
महात्माफुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकरणात सबसीडी लाटणारी टोळीने बनावट लाभार्थींचे बनावट दस्तऐवज तयार केले होते. एवढेच नव्हे तर, बँकेचे देखील कागदपत्र आणि बनावट शिक्के तयार केले होते. हीच पद्धत आताच्या बनावट गृह कर्ज प्रकरणात वापरण्यात आल्याचे समोर येत आहेत. तक्रारदाराने देखील आपल्या तक्रारी अर्जात तसे नमूद केले होते.