जळगाव (प्रतिनिधी) शहरातील डाळ व्यापारी विनोदकुमार चंचलचंद जैन (वय ४१) यांची दलालांसह तीन व्यापाऱ्यांकडून ३६ लाख रुपयात गंडविले. जैन यांनी त्यांच्याकडे मालाची पैसे मागितले असता, त्यांना ‘पैसे मिळणार नाहीत, जे होईल ते करून घे, अशी धमकी देखील दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर त्यांनी दोन जणांना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
शहरातील एमआयडीसी परिसरातील महावीर अपार्टमेंटमध्ये विनोदकुमार जैन हे वास्तव्यास असून त्यांची एमआयडीसीत सक्षम उद्योग नावाची दालमील असून त्यांचा २० वर्षांपासून डाळ प्रोसेसिंगचा व्यवसाय आहे. बालाजी ट्रेडिंगचा दलाल सूर्यकांत उर्फ राज संजय व्यास याने त्यांचा विश्वास संपादन केला. व्यासने जैन यांना किशोर ट्रेडर्सचे किशोर पुरोहीत, आयुष ट्रेडर्सचे दीपक व्यास आणि विष्णुकांत पुरोहीत ट्रेडर्सचे श्रीकांत पुरोहीत यांना मोठ्या प्रमाणात डाळ हवी असल्याचे सांगितले, त्यानुसार या व्यवहाराला सुरुवात झाली. या दलालाच्या सांगण्यावरून, जैन यांनी दि. २८ जानेवारी २०२४ रोजी आयुष ट्रेडर्सला ४ लाख ३८ हजार ६० रुपयांची मूग डाळ पाठवली. त्यानंतर दि. १ फेब्रुवारी रोजी पुन्हा ६ लाख ८० हजार रुपयांचा माल पाठवला.
धनादेश दिला मात्र तो वटला नाही
संशयितांनी मालाचे पैसे १०-१२ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. दीपक व्यासने ६ लाख ६३ हजार रुपयांचा चेक दिला, पण खात्यात पुरेसे पैसे नसल्याने तो बाउंस झाला. यानंतर, संशयितांनी पुन्हा ४ लाख ४७ हजार रुपयांची डाळ मागवली. जैन यांना एकूण ३६ लाख ३९ हजार ६५० रुपयांचा माल देऊनही त्याचे पैसे मिळाले नाहीत.
पैशांची मागणी केल्यानंतर मिळाली धमकी
जेव्हा जैन यांनी पैशांची मागणी केली असता संशयितांनी ‘पैसे मिळणार नाहीत, जे होईल ते करून घे, अशी धमकी दिली. त्यानंतर जैन दि. १० सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार बालाजी ट्रेडींगचा दलाल सुर्यकांत उर्फ राज संजय व्यास (रा. दाळफळ शिवाजी नगर), किशोर ट्रेडर्सचे मालक किशोर मिठालाल पुरोहीत (रा. दाळफळ, शिवाजी नगर), विष्णूकांत लक्ष्मीनारायण पुरोहीत ट्रेडर्सचे मालक श्रीकांत पुरोहीत (रा. शिवाजीनगर) व आयुष ट्रेडर्सचे मालक दीपक राजेश व्यास (रा. शिवाजीनगर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच दोघांना अटक
चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार आर्थीक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर मिठालाल पुरोहीत व दीपक राजेश व्यास (दोघ रा. शिवाजी नगर) यांना बुधवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास सपोनि गणेश फड हे करीत आहे.
















