जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नेरी नाका येथी वैकुंठधाममध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीचे लवकरच लोकार्पण होणार असून बुधवारी महापौर सौ. भारती सोनवणे व मनपा आयुक्तांनी प्रकल्पाची पाहणी केली.
नेरीनाका येथील वैकुंठधाममध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गॅस शवदाहिनी साकारण्याचे काम काही महिन्यांपासून सुरू होते. संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याची चाचणी घेण्यात आली आहे. बुधवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, अतुलसिंग हाडा, विठोबा चौधरी, उपायुक्त पवन पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे प्रमुख भरत अमळकर, प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी, जनता बैंक अध्यक्ष प्रा.अनिल राव, प्रमुख देणगीदार रिखबराज बाफना, बेघर निवारा केंद्राचे प्रमुख दिलीप चोपडा, विनोद जैन, राजू दोशी,निलेश झंवर, संजय येवले, बापू महाले आदींसह मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
भव्य विश्रांती हॉल आणि सुसज्ज यंत्रणा
नेरीनाका वैकुंठधाममध्ये असलेल्या विश्रांती कक्षाचे केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे नूतनीकरण करण्यात आले. तसेच त्या शेजारी नवीन बांधकाम करून सुसज्ज गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर व प्रकल्प प्रमुख नंदूअडवाणी यानी संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. भविष्यात आणखी गरज भासल्यास एक स्वतंत्र युनीट स्थापित करता येईल अशी व्यवस्था असल्याचेही त्यांनी सांगितले.
एका अंत्यविधीसाठी आकारणार केवळ १५०० रुपये सेवाशुल्क
गॅस शवदाहिनीमध्ये एका मृतदेहाचा संपूर्ण अंत्यविधी पार पाडायला १ तास वेळ लागतो. प्रत्येक मृतदेह दहन करायला एक गॅस सिलेंडर आणि इतर यंत्रणा लागते. सर्वसाधारणपणे पारंपरिकरित्या अंत्यविधी करताना लाकूड, डिझेल, गोवऱ्या, तूप असा साधारणतः ३ ते १५ हजारांचा खर्च येत असतो. केशवस्मृती प्रतिष्ठान राबवित असलेल्या या प्रकल्पात एक शव दहन करायला ४५०० रुपये खर्च होतात परंतु नागरिकांकडून केवळ १५०० रुपये सेवाशुल्क घेण्यात येणार आहे. मुळात गॅसदाहिनीमुळे लाकूड, गोवऱ्या जाळल्या जाऊन होणारे पर्यावरणाचे नुकसान रोखले जाणार असून पर्यावरणास हातभार लावण्यास मदत होणार आहे.
स्वयंसहायता गटाची निर्मिती
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गॅस दाहिनीचे संचालन योग्यरीतीने व्हावे याकरिता जळगाव शहरातील विविध समाजातील नागरिकांचा समावेश असलेला स्वतंत्र स्वयंसहायता गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाच्या माध्यमातून या वैकुंठदाहीनीचे संचालन व व्यवस्थापन केले जाणार आहे. याचे प्रमुख म्हणून जळगावातील उद्योजक नंदु अडवाणी हे काम पाहतील. यात सेवाभावी काम करू इच्छिणाऱ्यांचे स्वागत असल्याचे भरत अमळकर म्हणाले.
लवकरच होणार लोकार्पण
गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची वेळ घेऊन संभाजी राजे नाट्यगृहात व्हर्च्युअल स्वरूपात मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प प्रमुखांनी दिली.
















