जळगाव (प्रतिनिधी) तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचे सांगत १८ जणांची ५५ लाखात फसवणूक केली होती. फसवणुक करणाऱ्या तोतया पीएची पत्नी अर्पिता हितेश संघवी (वय ४५, रा. नवी मुंबई) हिला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुंबई येथून अटक केली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत हितेश रमेश संघवी (वय ४९) याने रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्यासह म्हाडामध्ये फ्लॅट देणे व इतर वेगवेगळे आमिष दाखवून १८ जणांची ५५ लाख ६० हजार रुपयात फसवणूक केली होती. या प्रकरणात हितेश हा वेगवेगळे अमिष दाखवायचा तर त्याची पत्नी अर्पिता संघवी ही कागदपत्रे जमा करीत असे. या प्रकरणी दि. ८ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
मुंबईतून अटक करीत आणले जळगावात
दाम्पत्याच्या शोधात दोन पथके रवाना करण्यात आली होती. या पथकाकडून संशयितांचा शोध सुरु असतांना संशयित अर्पिता ही नवी मुंबई येथे घरी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवी मुंबईतील घरातून तिला दि. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अटक केली असून तीला जळगावात आणले आहे.