धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक बरखास्त करून पुन्हा नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी धरणगाव जागृत जनमंचचे अध्यक्ष जितेंद्र दिलीप महाजन यांनी धरणगाव सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धरणगाव जागृत जनमंचचे अध्यक्ष जितेंद्र दिलीप महाजन यांनी निवेदनात म्हटले आहे की, धरणगाव विकास सोसायटीची निवडणूक ही पारदर्शकरित्या झालेली नाही. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झालेली आहे. तसेच निवडणूक नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली असतांना सुद्धा मागे घेण्याच्या दोन दिवसानंतर सुद्धा नामांकन अर्ज मागे घेण्यात आलेले आहेत. तसेच त्यास निवडणूक निर्णय अधिकारी तडवी यांनी देखील संमती देत त्यांचे माघारीचे अर्ज स्वीकारलेले आहेत. हे करणे न्यायोचित नसून निवडणुकीत गैरकारभार झाल्याचे लक्षण आहे. सदर स्वीकारलेले अर्ज रद्दबातल ठरविण्यात यावेत. तरी सदर धरणगाव विकास सोसायटीची निवडणूक बरखास्त करण्यात यावी व निवडणूक नव्याने घेण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.