धरणगाव (प्रतिनिधी) शहरतील एका भागात आठ आणि पाच वर्षाच्या दोन बालिकांसोबत एका ६२ वर्षाच्या वृद्धाने अश्लील चाळे केल्यानंतर संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे (वय : ६२) याच्याविरुद्ध पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा करण्यात आला होता. तर फिर्यादीस धमकावले म्हणून भूषण मराठे विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातही आता विनयभंगाचे कलम वाढविण्यात आले आहे. दुसरीकडे चंदुलाल मराठेला एक दिवसाची पोलीस कोठडी तर भूषण यास अटी, शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दुसऱ्या गुन्ह्यात वाढवले विनयभंगाचे कलम ; पिडीतेच्या परिसरात न जाण्याच्या अटीवर जामीन
पतीसह दोघी मुलींना घेऊन या महिलेने सायंकाळी पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून उशिरा गुन्हा दाखल झाला. यावेळी संशयित आरोपी चंदुलाल मराठेचा मुलगा भूषण मराठे याने पोलीस स्टेशन मध्येच पीडितेच्या आईला धमकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्याच्याविरुद्ध देखील फिर्यादीस धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आज भूषणला कोर्टात हजर केले असता त्याच्याविरुद्ध देखील अश्लील शिवीगाळसह विनयभंगाचे कलम वाढविण्यात आले. दरम्यान, कोर्टाने जामीन देतांना दोषारोप पत्र दाखल होत नाही, तोपर्यंत पीडीतेच्या परिसरात न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे. दुसरीकडे पहिल्या पोस्कोच्या गुन्ह्यात संशयित आरोपी चंदुलाल मराठेला जळगाव न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश अहिरे हे करीत आहेत.
काय होतं नेमकं प्रकरण ?
धरणगावातील एका परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची पीठाची गिरणी आहे. याच परिसरात राहणारी एक महिला दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आली होती. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. तर दळण दळून त्यांची आई घरी निघून गेली. उशीर झाला तरी मुली घरी न आल्यामुळे आई त्यांना घेण्यासाठी परत आली. त्यावेळी चंदुलाल मराठे याने दोन्ही मुलींना आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी आणले. सहा वर्षाच्या बालिकेने चक्कीवाल्या बाबाने आपल्यालाही मांडीवर बसवले असे सांगताच आई हादरली. कामावर गेलेला नवरा घरी परतताच तिने सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी संयमाने हाताळली परिस्थिती !
दोन बालिकांचा विनय भानग झाल्याची वार्ता गावात वार्यासारखी पसरली. त्यामुळे थोड्याच वेळात रात्री संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन आवारात गर्दी केली होती. तशात फिर्यादी महिलेस शिवीगाळ झाल्यामुळे तणावात भर पडली. मात्र, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी समयसूचकता दाखवत संयमाने परिस्थिती हाताळली. आरोपींवर कडक कारवाई होईल, असे आश्वासन दिले. यानंतर नागरिक शांत झाले. पो.नि. शेळके यांनी मध्यरात्री तीन वाजेपर्यंत पोलीस स्थानकातच थांबून सर्व परिस्थिती हाताळली. यानंतर आज सकाळी दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले. दरम्यान, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी शांतपणे परिस्थिती हाताळल्यामुळे गावात तणाव वाढला नाही.