धरणगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेत ‘इंटरनेट कनेक्टीव्हीटी’च्या अडचणीमुळे चार दिवसांपासून व्यवहार झालेला नाही. त्यामुळे असंख्य वयोवृध्द खातेदार आपल्या हक्काच्या पैशासाठी बँकेच्या कार्यालयात चातका प्रमाणे इंटरनेट कनेक्टीव्हीटीची प्रतीक्षा बघत आहेत. हताश खातेदार आणि हतबल कर्मचारी पाहून जिल्हा बँकेचा कारभार ‘राम भरोसे’ असल्याचा प्रत्यय येत आहे.
शेतकरी, खातेदारांची ही हताशा कालपासून सुरू आहे. हक्काचा पैसा मिळत नसल्याने प्रत्येक जण आपल्या नशिबाला दोष देत आहे. परिस्थितीवर आवाज उठविणारा कुणीच नसल्याने त्यांना फार अडचण सहन करावी लागत आहे. चार दिवसापासून इंटरनेट नसल्यामुळे कामकाज बंद असल्याचे जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांना लक्षात आले नसेल का? ही संपूर्ण यंत्रणा सर्व्हरच्या माध्यमातून सूरू असते. यासाठी टेक्नीकल सपोर्ट टिम असते. या टिमच्या लक्षात ही गंभीर बाब का आली नाही? तालुकास्तरावरील शाखेचा कारभार दोन दिवस होत नसेल तर याची कल्पना कार्यकारी संचालक देण्यात आली आहे का? त्यांना याचे गांभीर्य आहे का? खातेदार, शेतकऱ्यांची होणारी फरफट कुणालाच दिसू नये या पेक्षा दुसरे दुर्देव काय असू शकते. धरणगाव तालुक्यातील जिल्हा बँक शाखेचे इंटरनेट सेवा बंद असल्याने याकडे कोणी लक्ष देईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या दोन दिवसापासून इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने नवीन वायर टाकण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी बीएसएनएल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. ती जेव्हा पूर्णपणे टाकली जाईल त्यावेळेस इंटरनेट सेवा सुरु करण्यात येईल. असे जिल्हा बँक शाखा व्यवस्थापक अजय भटनाकर यांनी सागितले.